Welcome to Sahyadri Shikshan Sanstha's Blog.

Friday 18 March 2011

शिक्षण व सहकारातील दीपस्तंभ


 श्री. विनोद फणसे यांचा दै. प्रहार मध्ये स्व. गोविंदराव निकम यांच्या ७६ व्या जयंती निमित्त प्रकाशित झालेला लेख......



शिक्षण व सहकारातील 
दीपस्तंभ

          सह्याद्रि शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. गोविंदरावजी निकम यांची ७६ वी जयंती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 'सह्याद्रि' च्या विविध शाखांमध्ये आज साजरी होत आहे. या कर्मयोग्याने वयाच्या २२ व्या वर्षी 'सह्याद्रि शिक्षण संस्थेची' स्थापना केली. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून कोकणामध्ये शिक्षणाची पंढरी निर्माण केली आणि गोरगरीब जनतेच्या मुलांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविणारा आधुनिक भगिरथ होण्याचा बहुमान या ऋषितुल्य शिक्षण महर्षींनी मिळविला. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणूनच त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने आज साजरी केली जात आहे. या निमित्ताने या महान व्यक्तीला विनम्र आदरांजली ... !
"इवलेसे रोप लावियले द्वारी,
याचा वेलू गेला गगनावरी ...!"
या संत वचनाप्रमाणे स्व. गोविंदरावजी निकम साहेबांनी स्थापन केलेल्या सह्याद्रि शिक्षण संस्थेने गेल्या ५० वर्षांच्या काळात कोकणात ३३ माध्यमिक विद्यालये, ६ कनिष्ठ महाविद्यालये, १५ व्यावसायिक महाविद्यालये, ५ प्राथमिक शाळा व अनेक वसतिगृह निर्माण करून शिक्षण क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे, ती केवळ निकम साहेबांच्या धाडस, अपार मेहनत, प्रचंड कष्टाची तयारी, सहकार्र्यां विश्वास ... दूरदृष्टीकोन ... शिस्त ... कणखरपणा आणि कर्मचार्र्यांवरील अलोट प्रेम या अष्टावधानी गुणामुळेच त्यांच्याकडे 'शिक्षण महर्षी ' म्हणून आदराने पहिले जाते. शिक्षण क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे पहिले जाते. तद्वतच कोकणामध्ये कर्मयोगी म्हणून स्व. दादांकडे पहिले जाते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
           चिपळूण तालुक्यातील फुरूस या मूळ गावामध्ये वास्तव्य करणारे त्यांचे वडील कै.  शावजीराव निकम यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचा वसा स्व. गोविंदरावांनी घेतला. सुरुवातीला एल. आय. सी. चा व्यवसाय करून पहिला. परंतू त्यावेळचे निळीचे जमीनदार कै. सुर्वेसाहेब यांनी निकमसाहेबांना तुम्ही शिक्षणाचे काम का करत नाही? वडिलांचा समाजसेवेचा वसा तुम्हीही चालू ठेवा. असा सल्ला दिला. शिक्षणाची, समाजसेवेची मिळालेली प्रेरणा स्व. निकमसाहेबांनी आयुष्यभर जोपासली. दादांचे कर्तृत्व व व्यक्तिमत्व अथांग सागरासारखे होते. आजच्या तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने व धडाडीने काम करणारे निकमसाहेब आम्ही अगदी २४ जानेवारी २००८ पर्यंत पहिले आहेत. २४ जानेवारी या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवशीसुद्धा प्रकृती साथ देत नसतानादेखील सकाळी आमच्या शाळेत येवून श्री वेनेश्वराचे दर्शन घेवून सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभाची तयारी कशी चालली आहे हे डोळेभरून पाहिले. किरकोळ काही सूचना करून अत्यंत प्रसन्न मनाने, समाधानाने सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कार्यालयाकडे गेले ... ते पुन्हा परत न येण्यासाठीच! म्हणूनच म्हणावेसे वाटते, "जो आवडतो सर्वाना, तोची आवडे देवाला ...!"
          सहकार क्षेत्रामध्येसुद्धा निकमसाहेबांची कामगिरी स्पृहणीय आहे. अगदी गावपातळीवरील सहकारी पतसंस्थेपासून सुरुवात करून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व मिळवत त्यांनी महाराष्ट्र राज्य शिखर बँकेपर्यंत धडक मारून 'सहकार क्षेत्रात कोकणही मागे नाही' हे मोठमोठ्या सहकार संम्राटांना दाखवून दिले. राजकारणामध्येही सावर्डे ग्रामपंचातीपासून सुरुवात करत रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण सभापती म्हणून आपला ठसा उमटविला. रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार म्हणून संसदेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. आपल्या खासदारकीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. एक व्यक्ती एकाच वेळेला शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण, शेती, उद्योग व व्यापार या सर्व क्षेत्रात लीलया भरारी मारू शकते, हे केवळ आणि केवळ निकमसाहेबांच्या बाबतीत खरे ठरते, यात तिळमात्र शंका नाही.
           कोकणातील विद्यार्थी नुसत्या पदव्या घेऊन फिरणार नाही, तर स्वावलंनाने स्वतःच्या पायावर उभा राहून तो विविध व्यवसाय करेल, हा आधुनिक विचार अंमलात आणून स्व. निकमसाहेबांनी सन १९८३ मध्ये अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय, आयटीआय, पॉलीटेक्निक, फार्मसी, कृषी महाविद्यालय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शाखा सुरु केल्या. त्या माध्यमातून येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि रत्नागिरी जिल्हा मनीर्डरमुक्त कसा होईल याला प्राधान्य दिले. सहकारी सूतगिरणी, सहकारी साखर कारखाना, कुक्कुटपालन संघ असे नवनवीन प्रकल्प सुरु करून सावर्डे हे रत्नागिरी जिल्ह्याचे एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र बनविले. मंडणगडपासून सावंतवाडीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून जाताना स्वपक्षातील अगर विरोधी पक्षातील महत्वाच्या व्यक्ती, सरपंच, जि.प. सदस्य, आमदार, खासदार, मंत्री आदी व्यक्ती सावर्डेमधून जाताना स्व. निकमसाहेबांना भेटून पुढे जात असत. इतका निकम साहेबांचा दबदबा राजकारणी व समाजकारणी लोकांमध्ये निर्माण झाला होता. निकम साहेबांच्या कार्याचा हा वसा त्यांचे सुपुत्र संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम हे तेवढ्याच जोमाने किंबहुना जास्त धडाडीने सांभाळत आहेत.
        'दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' या उक्तीप्रमाणे निकमसाहेबांच्या या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून कै. भाऊसाहेब महाडिक, जी.के. खेतले साहेब, आप्पासाहेब शेंबेकर, काशिनाथराव घाग, वसंतराव देसाई, अहमद कापडी, बाबाशेठ खलपे, आप्पासाहेब मोहिरे अशा असंख्य सहकार्र्यानी तन - मन आणि धन देऊन सहकार्याचा हात दिला. सह्याद्रि शिक्षण संस्था हि पैशाने मोठी करण्यापेक्षा उत्तुंग मनाची माणसे तयार करून त्यांनी ही संस्था मोठी केली आहे. कै. भाईसाहेब सावंत, राजाभाऊ रेडीज, भाऊसाहेब महाडिक, शिवाजीराव घाग आदी सहकाऱ्यांची विविध शाखांना नावे देऊन त्यांची उचित स्मारके निर्माण केली आहेत. या सर्व कार्यात श्रीमती अनुराधाताई निकम यांचाही मोलाचा वाटा आहे. आज निकम साहेबांच्या पश्च्यात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधाताई निकम, कार्याध्यक्ष शेखरजी निकम, उपाध्यक्ष श्री. बबनशेठ पवार, श्री. बाबासाहेब भुवड, सचिव श्री. अशोकराव विचारे व संचालक श्री. शांताराम खानविलकर, श्री. द.ना. शेंबेकर, श्री. बाबाशेठ सुर्वे, श्री. मारुती घाग, श्री. महमूद खपे, श्री. मानसिंग महाडिक, सौ. आकांक्षा पवार हे सर्व संचालक मंडळ संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. निकम साहेबांनी आखून दिलेल्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्याचे व सह्याद्रि शिक्षण संस्थेला नावारूपाला आणण्याचे काम ही सर्व मंडळी करीत आहेत. कै. निकम साहेब आज तनाने आपल्यात नाहीत, पण मनाने मात्र आम्हा कर्मचार्र्यांमध्ये ते आहेतच!
        "उतरणार नाही ... मातणार नाही ... त्यांच्या कार्याचा वसा आम्ही टाकणार नाही" एवढे म्हणून आज स्व. निकम साहेबांच्या ७६ व्या जयंती निमित्ताने त्यांना त्रिवार अभिवादन करतो. त्यांच्या कार्यात एक शिक्षक म्हणून मला खारीचा वाटा उचलता आला, यातच पूर्ण समाधान आहे. या कर्मयोग्याला, आधुनिक भगिरथाला माझा सलाम! 

श्री. विनोद फणसे

No comments: